रानभाजी - कुलु

 

रानभाजी - कुलु  

इतर नावे : फोडशी, काल्ला, धापा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/10/ 2024 : पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात सर्वत्र दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं. कुलु, फोडशी, धापा किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी ओळखली जाते. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि सुध्दा चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

पाककृती

# साहित्य - कुलू च्या २ ते ३ जुड्या, २ कांदे चिरुन, पाव वाटी कोणतीही डाळ भिजवून, ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन, २ मिरच्या चिरुन, ओलं खोबरं अर्धी मुठ, चवीनुसार मिठ, १ चमचा टोमॅटो सॉस नसल्यास साखर.

# कृती - कुलू ची एक एक पाती वेगळी करून घ्या. खाली जास्त पांढरा भाग असल्यास काढा. मध्ये जर कडक दांडी असेल तर काढा आणि स्वच्छ धुवून चिरुन घ्या. भांड्यात तेल तापवून त्यावर लसुण पाकळ्या व मिरच्यांची फोडणी देउन कांदा घाला. त्यावर हिंग, हळद घाला व परतवून डाळ घालून परत परता. आता ह्यावर चिरलेली भाजी घाला व झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परता. भाजी बसल्यामुळे व्यवस्थित परतता येते. भांड्याच्या बाहेर जात नाही. ह्यावर मिठ घाला व डाळ शिजू द्या. डाळ शिजली की वरून खोबरे पेरून परता आणि गॅस बंद करा. झाली भाजी तय्यार.

# टिप - हिच भाजी आधी उकडून घेण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे ती मऊ होते. पण डायरेक्ट केली तर जास्त रुचकर व पौष्टीक होते.

सौजन्य : इंटरनेट/मिसळपाव

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या