अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/10/ 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आज रोजी मॉडेल पार्लमेंट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात सभापतीच्या निवडीपासून झाली. यानंतर राष्ट्रगीत गायन आणि सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर तसेच इतर महत्त्वाचे विषयांवर चर्चा करण्यात आली.
विरोधी पक्षाच्या बाकावरून विद्यार्थ्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले, ज्यात शेतकरी आत्महत्या, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, देशाचे संरक्षण, जीएसटी, आणि सीमा प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. सत्तारूढ पक्षातील विद्यार्थ्यांना यावर उत्तरे देण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संसदीय अनुभव मिळाला.
विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांची विचारसरणी व्यापक लोकशाहीवादी व्हावी, हा मॉडेल पार्लमेंट उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सखोल विचार करण्याची क्षमता विकसित होते," असे मत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विश्वनाथ आवड यांनी व्यक्त केले.
या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्राचार्य टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले आहेत. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना चालना देण्याचा सतत प्रयत्न केला जातो.
0 टिप्पण्या