रानभाजी - गाबोळी

 

रानभाजी - गाबोळी  

स्थानिक नावे : शेंजवेल, उळशीचा मोहोर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/10/ 2024 : पावसाळ्यात रानावनात साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गाबोळीच्या वेलींना मोहोर फुटायला तयार होतो. हा मोहोर मासळीच्या अंड्याप्रमाणे दिसून येतो. कोळीवाड्यात मासळीच्या अंडींना गाबोळी संबोधले जाते, तसेच हि भाजी खाल्ल्यानंतर हुबेहूब गाबोळी खाल्ल्याचा भास होतो. पावसाळा सुरु झाला कि आपल्या जवळच्या बाजारात अनेक रानभाज्या दाखल होत असतात. पण गाबोळीची भाजी हि दुर्मिळच दिसून येते. मुरबाड, ठाणे, डहाणू, रायगड जिल्ह्यामध्ये हि भाजी दिसून येते.

पाककृती

# साहित्य- २-३ जुड्या गाबोळीची भाजी (उळशीचा मोहोर), १०० ग्रॅम ओल्या नारळाचा कीस, ७-८ ठेचलेले लसूण पाकळी, ३ कांदे बारीक चिरलेले, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा राई, अर्धा जीरे, १ चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग आणि चवी नुसार मीठ.

# कृती- एका खोलगट पॅन मध्ये ३ चमचे तेल तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात राई जीरे टाका. राई जीरे तडकायला लागले कि लसूण पाकळ्या, हिंग, बारीक चिरलेल्या मिरच्या टाका. परतून घ्या. परतून झाल्यानंतर कांदा टाका आणि तांबूस रंगापर्यंत परतून घ्या. आता यात हळद टाका. परतून घ्या. आता गाबोळीची भाजी घाला. (वेली सकट एका भांड्यात कोमट पाणी करून त्यात हि भाजी १० मिनिटांकरिता ठेवावी. मोहोर मध्ये लपून बसलेली धूळ आणि माती तळाला जमा होईल. नंतर साध्या पाण्याने पुन्हा धुवून घ्यावी. हि भाजी निवडताना त्याच्या फक्त शेरी घ्यायच्या). भाजी फोडणी मध्ये चांगली एकजीव करून घ्या. भाजीच्या भांड्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा. १० मिनिटानंतर यात ओल्या नारळाचा कीस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. चवीनुसार मीठ टाकून घ्या. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. १० मिनिटानंतर हलकी परतून घ्या आणि एका बाऊल मध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या