रानभाजी - फांग
शास्त्रीय : Rivea hypocrateriformis
कुळ : Convolvulaceae
स्थानिक : फांद,फांजी,फांज,सांजवेल
इंग्रजी : Midnapore Creeper, Common Night Glory
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/ 2024 : फांग ही पावसाळ्यात उगवणारी झुडूपवर्गीय वेल आहे. याच्या कोवळ्या पानांची भाजी आणि मुटकुळे बनवतात. याचा उपलब्धीचा काळ हा जुलै ते सप्टेंबर महिन्या पर्यंत असतो. ही वनस्पती औषधी गुणांनी उपयुक्त आहे.
औषधी उपयोग
# पाने व मुळे औषधात वापरली जातात. # पाने अतिशय पौष्टिक, खनिजयुक्त आहेत. याची कोवळी पाने भाजीसाठी वापरली जातात. # लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठल्यास पाने व फांद्यापासून तयार केलेला रस चोळतात. # खोकला, मलेरिया, डोकेदुखी व त्वचारोगावारही उपयुक्त. # बाळंतपणानंतर मातेला याची मुळे खायला देतात. # पानांपासून तयार केलेले तेल संधिवात तसेच केसांच्या टाळूवरील आजारावर वापरतात.
पाककृती - कोवळ्या पानांचे मुटकुळे
# साहित्य - ३ ते ४ वाट्या फांगची कोवळी पाने, अर्धी वाटी बेसनपीठ, १ वाटी ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, २ ते ३ चमचा लसून हिरवी मिरची पेस्ट, १ ते दीड चमचा हळद, १ ते २ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा धने पावडर, किंवा बारीक चिरलेली कोंथिबीर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.
# कृती - प्रथम फांगची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. त्यात बेसन, ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, लसूण मिरचीची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, धने पावडर किंवा बारीक चिरलेली कोंथिबीर टाकून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर थोडे थोडे पाणी टाकून चांगले मळून त्याचे छोटे छोटे मुटकुळे तयार करून घ्यावे. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. एका लहान ताटली मध्ये तेल लावून त्यात मुटकुळे ठेवून ते वाफवून घ्यावे. एका कढईत जिरे, मोहरीची फोडणी तयार करून, त्यामध्ये मुटकुळे कापून लालसर होई पर्यंत परतून घ्यावे. हे मुटकुळे खाण्यास छान लागतात.
पाककृती : कोवळ्या पानांची भाजी
# साहित्य - ३ ते ४ वाट्या फांगची कोवळी पाने, १ ते २ बारीक चिरलेले कांदे, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ ते २ कापलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, चवीपुरते शेंगदाण्याचा कूट, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, चवी प्रमाणे मीठ.
# कृती - कोवळी पाने व देठ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी तयार करून, त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्यावा. नंतर त्यात हळद व बारीक चिरलेली फांगची पाने टाकून नीट परतवून घ्यावीत. थोडे शिजत आले की शेंगदाण्याचा कूट मिसळावा, झाकण ठेवून मऊ होई पर्यंत नीट शिजवून घ्यावे. चवी प्रमाणे मीठ मिसळावे.
# टीप - काही ठिकाणी फांगची कोवळी पाने थोड्या पाण्यात शिजवून ते मिश्रण बाजरी किंवा ज्वारीच्या पिठात मळून त्याच्या भाकऱ्या करण्याची पद्धत आहे.
संदर्भ : फेसबुक
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या