रानभाजी - करडकोसला
शास्त्रीय : Goniocaulon indicum
कुळ : Asteraceae
इंग्रजी : Indian Cornflower
इतर नावे : कुसंबा, करड कुसुंबा, घेटुर, करसकोसला, करडकुंभा, करडरान.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/ 2024 :
करडकोसला ही वर्षायू वनस्पती असून मूळची भारत, पाकिस्तान, म्यानमार, इथिओपिया आणि सुदान या देशांतील आहे तर भारतामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे आढळून येते आणि महाराष्ट्रात सर्वत्र उगवते. करडकोसला हा बहुदा शेतात आढळून येतो तर काळ्या मातीमध्ये याची भरपूर वाढ दिसून येते. पाने हिरवीगार, टोकदार असून पानांच्या कडेला काटे असतात. याला जानेवारी ते मार्च मध्ये गुलाबीसर जांभळी सुंदर फुले येतात. रब्बी पिकासोबत करडकोसला वाढतो त्यामुळे रब्बी पिकातील हे फार त्रासदायक तण आहे. करडकोसला Asteraceae कुळातील आहे. या कुळातील काही वनस्पती शोभेकरिता (शेवंती, झेंडू, डेलिया, सूर्यफूल इ.), तेलाकरिता (कारळे, करडई, सूर्यफूल इ.) औषधाकरिता (माका, अक्कलकारा, कडू जिरे इ.) वापरल्या जातात. करडकोसल्याची पाने दिसायला करडीच्या भाजी सारखी असून चव सुद्धा बरीचशी करडीला जुळतीमिळती आहे. करडीच्या भाजी आठवण झाली तर करडकोसला सुद्धा खाऊ शकतो असे म्हटल्या जाते. शेतामध्ये काम करणारे विशेषतः महिला व पुरुष मजूर करडकोसला, पातूर, आंबुशी यासारख्या रानभाज्या तोडतात व जेवताना डब्यातील चटणी भाकरी किंवा भाजी पोळी सोबत या रानभाज्या तोंडी लावायला घेतात. त्यामुळे निश्चितच पोषक, स्वस्थ व विनामूल्य रानभाजी त्याच्या आहाराचा भाग बनून जाते. पालक, मेथी, संभार यांच्या स्वादातील एकसूरीपणा कमी होतो. या वनस्पतीचा उपलब्धीचा काळ ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्या पर्यंत असतो.
पोषकतत्वे
करडकोसल्यामध्ये कॅल्शियम व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आणि लोह, जीवनसत्व क व प्रथिने कमी असतात. कॅल्शिअम हाडे व दातांना मजबुती देते. लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते. जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. प्रथिने शरीराची झीज भरून काढते. तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
पोटदुखी मध्ये भाजीचे सेवन हितकारक आहे. डोकेदुखीवर पानांचा रस फायदेशीर आहे. कोठा साफ करते.
पाककृती
१) लवट - करडकोसल्याची पाने स्वच्छ करून बारीक चिरून घेतात. त्या पानांना जिरे, हळद, धणेपूड, लाल तिखट, ओवा, आमचूर, मीठ लावून घेतात नंतर त्यात बेसन (चना किंवा तूरीचे) थोडे पाणी टाकून भिजवतात व त्याच्या मुठी बांधून, दाथरावर (गंजामध्ये तुराट्या टाकतात किंवा कापड बांधतात) वाफवून घेतात. थंड झाल्यावर काप करून घेतात. तेलात मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण अद्रक, हिरवी मिरची, हळद, धणेपूड टाकून फोडणी करतात व त्याच लवटाचे कापलेले तुकडे व मीठ टाकून परतून घेतात. ज्वारीच्या भाकरी सोबत खातात. आंबटकरीता आता फोडणीमध्ये टोमॅटोचा वापर जास्त होतो. आवडीनुसार थोडे पाणी टाकून अंगासरशी रस्सा करता येतो. जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन भरपूर असल्यामुळे तुरीच्या बेसनाचा वापर अगदी सहज होतो.
२) घोळाना - करडकोसल्याची पाने खुडून स्वच्छ धुवून घेतात. पाने बारीक चिरून त्याला जिरे, लाल तिखट व मीठ लावतात. भाजी पोळी सोबत खातात. यात कांदा, टमाटर सुद्धा चिरून टाकतात.
३) भाजी - लोखंडी कढई किंवा तव्यावर तेल टाकून त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, हळद, हिरवी किंवा लाल मिरच्यांची फोडणी करतात. फोडणी तयार झाल्यावर त्यात चिरलेली भाजी व मीठ घालून शिजवून घेतात.
४) डाळभाजी - करडकोसल्याची पाने स्वच्छ करून बारीक चिरून घेतात. तूर डाळ शिजवून वरण करतात. तेलामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण अद्रकाचा ठेचा, धणेपूड, लाल तिखट एक एक सोडून फोडणी करतात. फोडणी झाल्यावर त्यात चिरलेली भाजी घालून शिजवून घेतात व तयार वरण, मीठ टाकून २-३ उकळी घेतात. आंबटासाठी कैरी, चिंच किंवा टोमॅटो टाकतात. वरण शिजवताना त्यात शेंगदाणे अगदी आवडीने घालतात.
© रूपल वाघ
संशोधक व आहारतज्ञ, अमरावती
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या