रानभाजी - करटोली

 

रानभाजी - करटोली  

शास्त्रीय नाव - मोमारडिका डायओयिका

कुळ - कुकरबिटेसी

स्थानिक नावे - कंटोली, करटुली, रानकारली

इंग्रजी - वाइल्ड करेला फ्रूट

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज

संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 05/09/2024 : करटोली ही वनस्पती 'कुकरबिटेसी' म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. करटोलीच्या स्त्रीजातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात. कंद लंबगोलाकार, पिवळट-पांढरे असून त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची रुची तुरट असते. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगला मध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, औषधात वापरतात.

खोड - नाजूक, आधाराने वर चढणारे.

पाने - साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती, हृदयाकृती, ३ ते ५ विभागीय, ३ ते १० सेंमी लांब, ३.५ ते ९ सेंमी रुंद, कडा दातेरी, पानांच्या बेचक्यातून तयार होतात व वेलींना वर चढण्यास मदत करतात. पानांचा देठ १.२ ते ३ सेंमी लांब.

फुले - पिवळी, नियमित, एकलिंगी. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. फुले पानांच्या बगलेतून एकांडी येतात, नर फुलांच्या देठाशी मोठा छद असतो, पुष्पकोश ५ संयुक्त दलांचा, पाकळ्या ५, एकमेकांस चिकटलेल्या, पुंकेसर ५, एकमेकांस चिकटलेले. बीजांडकोश तीन कप्पी.

फळे : लंबगोलाकार, ५ ते ७ सेंमी लांब. फळांवर नाजूक काट्यांचे आवरण. बिया अनेक. तांबड्या गरात लगडलेल्या.

औषधी उपयोग

# करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात. # रक्तार्शांत कंदाचे चूर्ण देतात. कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात. # करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. पाने कामोत्तेजक व कृमिनाशक असून, त्रिदोष, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्‍वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यात गुणकारी आहेत. # करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक, दीपक आणि थोडे विरेचक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत. # अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळ्यांचे रोग, धावरे या विकारांत करटोलीचा वापर करतात. वाळवलेल्या फळाचे चूर्ण किंवा फांट नाकपुडीत घातल्यास विपुल स्रावासाठी उत्तेजक आहे. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात. # करटोलीच्या फळांची भाजी कारल्या सारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते. ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याच बरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. ज्यांच्या मूळव्याधीतून वरचेवर रक्तस्राव होतो; वेदना, ठणका असताे, अशांसाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे. # सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. # त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी.

पाककृती-

# साहित्य - पाव किलो हिरवी कोवळी करटुली, ओले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, हिंग, मोहरी, मीठ, जिरे, हळद, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर, तेल इत्यादी.

# कृती - करटुल्यांचे अर्धे भाग करून त्यातील बिया व गर काढून टाकावा. नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरून घ्यावीत. पॅन मध्ये तेल गरम करून हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी. त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात. नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे. चिरलेली करटुलीध त्यात घालून पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरून ओले खोबरे व थोडी साखर घालावी.

पाककृती-२

# साहित्य - करटुली, भिजवलेली हरभरा डाळ, तिखट, मीठ, गूळ, हिंग, जिरे धन्याची पूड, खोबरे, तेल इत्यादी.

# कृती - आतल्या बिया काढून करटुली उभी चिरावीत. हिंगाची फोडणी करून त्यात भिजवलेली डाळ व करटुल्याच्या फोडी घालून चांगल्या परताव्यात. वाफा आल्यावर बेताचे पाणी घालून शिजू द्यावे. शिजत आल्यावर त्यात तिखट, मीठ, गूळ, जिरे-धन्याची पूड, ओले खोबरे घालून बेताचा रस राहील इतपत भाजी शिजू द्यावी. ही भाजी गोडा मसाला घालूनही रुचकर व चांगली लागते.

पाककृती-३

# साहित्य - करटुली, कांदे, सोललेल्या वालाच्या डाळिंब्या, वाटून घेतलेले जिरे-लसूण, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, साखर, ओले खोबरे, कोथिंबीर, हळद, तेल इत्यादी.

# कृती - करटुली बिया काढून उभी चिरून घ्यावीत. कांदाही उभा चिरून घ्यावा. नंतर तेलावर मोहरी, हिंग, हळद व चिरलेला कांदा टाकावा. त्यावर वालाच्या डाळिंब्या परताव्यात. नंतर जिऱ्याची व लसणीची पेस्ट, मिरचीची पेस्ट घालून ते सर्व मिश्रण परतून घ्यावे. मग हे मिश्रण करटुली घालून परतावे आणि झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यावी. नंतर भाजी शिजल्यावर त्यात मीठ, साखर, ओले खोबरे व कोथिंबीर टाकून ढवळावै.

पाककृती-४

# साहित्य - करटुली, मीठ, तेल, तिखट इत्यादी.

# कृती - करटुल्यांच्या बिया काढून टाकाव्यात व त्याच्या बारीक, पातळ, गोल चकत्या कापून घ्याव्यात. कढईत फोडणी करून त्यात करटुल्यांच्या चकत्या घालाव्यात. त्या कुरकुरीत होईपर्यंत परताव्यात. मग त्यात मीठ घालून, पाणी निघून जाईपर्यंत परताव्यात. भाजी शिजल्यावर खाली उतरवून त्यात लाल तिखट घालावे म्हणजे तिखट जळून जाणार नाही. ही भाजी कुरकुरीत होण्यासाठी झाकण न ठेवता शिजवावी. अशा पद्धतीने करटुल्यांच्या काचऱ्या हा भाजीचा प्रकार बनविता येईल.

संदर्भ : अग्रोवन/डॉ. मधुकर बाचुळकर

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या