ग्रामदेवता पुरस्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 8 सप्टेंबर 2024 :
सांगायला खूप आनंद होतो आहे की, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे यांच्यातर्फे मला आणि डॉ मनीषा सोनवणे अर्थातच सोहम ट्रस्ट ला "ग्रामदेवता पुरस्कार" जाहीर झाला आणि दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी समाजातील अत्यंत माननीय व्यक्तींच्या हस्ते तो वितरित झाला.
मी मला मिळालेल्या पुरस्काराची जाहीररीत्या वाच्यता कुठेच करत नाही, आपलं कौतुक आपल्याच तोंडाने काय सांगायचं ? इतरांनी कोणी सांगितलं तर भाग वेगळा ! घरात आता पुरस्कार इतके झालेत की आम्ही घरात राहतो ? का पुरस्कार ? हा प्रश्न पडतो. अर्थात हे लोकांचं प्रेम आणि माया आहे आणि आम्ही या प्रेम आणि माये पुढे नतमस्तक आहोत... !! असो, तर या पुरस्काराविषयी मात्र आज आवर्जून लिहीत आहे; त्याचं कारण पुढे कळेलच परंतु त्यासाठी पाच-सहा वर्षे मला भूतकाळात मागे जावं लागेल....!
अगदी सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा भीक मागणाऱ्या , याचना करणाऱ्या रस्त्यावरील लोकांना वैद्यकीय सेवा देणे एवढाच मर्यादित हेतू होता. अर्थात त्याचेही त्यावेळी अफाट कौतुक झाले...!"आपल्या डिग्रीचा आणि ज्ञानाचा खऱ्या अर्थाने समाजासाठी सदुपयोग करणारा डॉक्टर" या आशयाला अनुसरून एका खेडेगावामध्ये तिथल्या मान्यवरांनी माझा सन्मान सोहळा ठेवला होता. "भिकाऱ्यांचा डॉक्टर" म्हणजे काय ? हे त्यावेळी अगदीच नवीन होतं. भिकाऱ्यांचा डॉक्टर, म्हणजे कुणी भिकारीच डॉक्टर झाला आहे की काय ? की कुणी डॉक्टरच स्तेथोस्कोप ऐवजी हातात कटोरा घेऊन फिरत असेल ? अंगावर फाटके कपडे घालून फिरत असेल ? का तो सुटा बुटात असेल ? की हा कुणी भ्रमिष्ट माणूस आहे...? माझ्या सत्कार सोहळ्याला खूप गर्दी व्हायची. मी बोलतो काय ? आणि करतो काय ? याच्यात कोणाला फारसा रस नसायचा... वरील शंकांचे निरसन करण्यासाठी अनेक लोक बघे म्हणून यायचे. तर खेडेगावातल्या या सुद्धा कार्यक्रमाला खूप गर्दी झाली. संयोजकांनी अत्यंत आपुलकीने हृद्य वातावरणात हा सोहळा पार पाडला.
पण हा सोहळा चालू असताना मध्येच मात्र खूप मोठे मोठे आवाज, गडबड, गोंगाट, शिव्या कानावर आल्या. कार्यक्रम झाल्यानंतर मी संयोजकांना सहज विचारलं, 'कार्यक्रम सुरू असतानाच मध्ये आवाज कसला होता ?' ते म्हणाले, 'काही नाही हो तुम्हाला बघण्यासाठी गावातले काही भिकारी जमा झाले होते बाहेर... त्यांना तुम्हाला बघायचं होतं... भेटायचं होतं... बोलायचं होतं...!' ' अहो, मग बोलवायचं की त्यांना आत मध्ये...' चहाचा घोट घेत कोचवर मागे टेकत मी विचारलं. 'छे हो डॉक्टर काहीतरीच काय ? इथे सगळे "प्रतिष्ठित गावकरी" बसले आहेत, त्यांच्यात त्या "गलिच्छ भिकाऱ्यांना" कसं बोलावणार ? साल्यांना काठ्या मारून दिलं हाकलून... मघाचा गोंगाट तोच होता. आमच्या स्वयंसेवकांनी चोख काम केलं.... चला कार्यक्रम तर सुरळीत पार पडला.' तेही समाधानाने चहाचा घोट घेत बोलले. आत्तापर्यंत निवांत असलेला मी, आता मात्र सैरभैर झालो... चहा गोड असेलही परंतु आता मला तो जळजळीत ऍसिड वाटायला लागला... घशाखाली जाईना...!आत्ताच थोड्यावेळापूर्वी मी करत असलेल्या कामाचे गोडवे गायले.... पोवाडे गायले.... पण ज्यांच्यासाठी काम करत आहे, त्या वृद्धांना मात्र माझ्यासमोरच काठ्या हाणल्या... ? हा कसला दुटप्पीपणा... ? श्री गणपती समोर बसलेला उंदीर, "मुषक" होतो... "उंदीर मामा" होतो... त्याला सुद्धा "प्रसाद" भरवला जातो...! पण हाच उंदीर जेव्हा घरात दिसतो, तेव्हा "उंदीर मारायचे जालीम औषध" देऊन त्याला स्वर्गात पाठवून, त्याला मोक्ष प्राप्ती करून देऊन, लोक इथे पृथ्वीवरच पुण्य मिळवतात.. ! हा कसला दुटप्पीपणा... ? मी हातातला कप बाजूला ठेवून, कोच वरून चटकन उठलो आणि सर्वांना नमस्कार करून, जायला निघालो. संयोजक म्हणाले, 'अहो असे कसे जाता ? दोन घास खाऊन तरी जा.... !' मला आज कळलं होतं, आज सत्कारामुळे मी "मूषक" झालो होतो... "उंदीर मामा" झालो होतो आणि म्हणून माझ्यासाठी हा दोन घासाचा प्रसाद होता...! बाकी इतर वेळी कुठे सापडलो, तर आमची पात्रता जालीम औषधाचीच.... हाणलेल्या त्या काठ्यांचीच... ठेचून मरण्याचीच...!!! कोणतीही नाराजी व्यक्त न करता, सर्वांना नमस्कार करून मी तिथून निघालो.
हातानं काम सुरूच होतं... पण डोक्यात सतत चार शब्द... अहो, आम्ही "प्रतिष्ठित गावकरी" आणि ते साले "गलिच्छ भिकारी"....! हेच शब्द घणासारखे घाव माझ्या डोक्यात घालत होते... सतत तेच विचार...! "उंदीर" डोकं कुरतडत होता...! खूप विचार केल्यानंतर मात्र मी स्थिरावलो...संयोजक किंवा इतर कोणाचा काय दोष आहे यात ? मी हे काम करतो म्हणून मला भीक मागणाऱ्या समाजाविषयी आस्था आहे, पण मी जर हे काम करत नसतो, तर मलाही असंच वाटलं असतं ... ! संपूर्ण समाजाला सुद्धा असंच वाटतं.... !कुणाचाच काही दोष नाही... ! खुप दिवसांनी उमगलं, आपण फक्त वैद्यकीय सेवा देत आहोत.... यामुळे त्यांचं आयुष्य वाढेल कदाचित.... परंतु जगताना ते "भिकारी" म्हणून जगतील आणि मरताना "भिकारी" म्हणूनच मरतील... ! नुसती मूर्ती आणून उपयोग नसतो त्यात प्राणप्रतिष्ठापना करावी लागते...! कुणाला प्राण मिळवून द्यावे, इतकी माझी लायकी नाही परंतु एखाद्याला "गावकरी" म्हणून प्रतिष्ठा द्यावी याचा मी नक्कीच प्रयत्न करू शकतो ! प्राण नाही, पण प्रतिष्ठा तरी देऊ शकतो...! पण ही प्रतिष्ठा तरी कशी मिळवून देणार ?
भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवेल अशी कोणतीही योजना सध्या तरी अस्तित्वात नाही. मग एक भिकारी, गावकरी कसा होणार ? मी आणखी खोलात विचार करायला लागलो.... आणि जाणवलं, आपल्या वाटेत हजारो काटे पडलेले असतील तर त्या वाटेवर गालीचे घालायचे नसतात... आपण आपल्या पायात चप्पल घालायची असते... मग काटे टोचत नाहीत... !भीक मागणाऱ्या लोकांना सन्मान द्या, प्रतिष्ठा द्या, त्यांना झिडकारू नका.... असं गावभर सांगत फिरण्यापेक्षा / समाजाला विनंती करण्यापेक्षा / गालिचे घालत फिरण्यापेक्षा.... भीक मागणाऱ्या समाजालाच आपण इतकं समृद्ध बनवायचं, या उच्चतेवर आणि त्या टोकावर नेऊन ठेवायचं की.... समाज आपोआप त्यांना सन्मान देईल, प्रतिष्ठा देईल आणि आपोआप प्रतिष्ठित गावकरी म्हणून समाज त्यांना स्वीकारेल... ! अशा अर्थाने आता आम्ही आमच्या पायात चप्पल घालायचं ठरवलं. "कर खुद हि को बुलंद इतना..." या तत्त्वावर मग भीक मागणाऱ्या लोकांना बुलंद करायचं ठरवलं... आणि मी माझी कामाची दिशा बदलली.... आता नुसती वैद्यकीय सेवा न देता, यांच्यात काय कलागुण आहेत ? काय छंद आहेत ? काय स्ट्रेंथ आहे ? काय दोष आहेत ? हे शोधायला सुरुवात केली.
यांच्या अंगात असलेले कला गुण आणि स्किल यांचा मागोवा घेऊन, समाजात असलेल्या थोड्या फार ओळखींद्वारे, यांना नोकऱ्या मिळवून दिल्या किंवा स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय टाकून द्यायला मदत केली.यात मलाही माझ्या भीक मागणाऱ्या भिकारी समाजाने हात दिला, साथ दिली. 2019 पर्यंत सात ते आठ लोक कामाला लागले होते. हा आकडा काही खूप मोठा नव्हता, पण माझा उत्साह वाढवणारा होता. या समाजाला तोपर्यंत मी सुद्धा "भिकारी" हाच शब्द वापरत होतो.... "भिक्षेकरी" या शब्दाचं बारसं तोपर्यंत अजून माझ्या मनात झालं नव्हतं. या सात ते आठ कामाला लागलेल्या लोकांकडे पाहून मला एक जाणवलं, की एखाद्या भीक मागणाऱ्या माणसाला, आपण जर कष्ट करायला लावून स्वयंपूर्ण केलं, तर त्याच्यात आमुलाग्र बदल घडू शकतो. कामाच्या निमित्ताने चारचौघात उठ बस करताना, आपोआप त्याचा गलिच्छपणा निघून जातो, विचारांमध्ये फरक पडतो, इतरांकडे पाहून, शिक्षणाचं महत्त्व त्यालाही समजायला लागतं. व्यावहारीक भाषेत ज्याला प्रगती म्हटलं जातं, अशी हि प्रगती मागल्या दाराने आपोआप घरात येते. बघता बघता त्याला मानसन्मान मिळायला लागतो आणि तो आपोआप गावकरी होतो !एव्हाना, माझ्या मनातून भिकारी हा शब्द हद्दपार होऊन भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द जन्माला आला होता ! आता संपूर्ण गोळा बेरीज करून माझ्या डोक्यात एक कल्पना फिट्ट बसली ...भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी !!!फक्त वैद्यकीय सेवा न देता, भीक मागणाऱ्या लोकांना गावकरी बनवायचं, त्यासाठी वाटेल तो आटापिटा करावा लागला तरी चालेल... हे 2019 च्या मध्यापासून मी ठरवलं.
खेडेगावातल्या त्या सन्मान सोहळ्यात भीक मागणाऱ्या लोकांना हाकलून दिलं, हि एक घटना माझ्या आणि माझ्या भीक मागणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून गेली...भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी !!! हेच माझ्या आयुष्याचे अंतिम सत्य आणि अंतिम ध्येय आहे, हे मला आता समजलं. त्यावेळी जर हि घटना घडली नसती; तर कदाचित आजपर्यंत मी फक्त आणि फक्त वैद्यकीय सेवाच देत राहिलो असतो, यात भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा किंवा शिक्षणाचा विचार कदाचित माझ्या डोक्यात कधीच आला नसता.... ! वाईटातून चांगलं घडतं ते असं... ! एका मुलाखती दरम्यान मला एक प्रश्न विचारला होता, की भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या, त्यातल्या तुम्हाला काही गोष्टी पुसून टाकायची जर संधी मिळाली, तर कोणत्या गोष्टी तुम्ही पुसून टाकाल ? मी त्या वेळी सांगितलं होतं, की भूतकाळात घडलेली एखादी गोष्ट पुसावी, अशी संधी जर मला मिळाली, मी त्यातल्या एकाही गोष्टीला पुसून टाकणार नाही, उलट त्या सर्व गोष्टींपुढे मी नतमस्तक होईन... कारण त्याच गोष्टींमुळे तर मी शिकत गेलो... पडत गेलो, घडत गेलो आणि हळूहळू माकडाचा माणूस होत गेलो....!
खेडेगावात त्या घडलेल्या गोष्टीचा मला त्यावेळी त्रास झाला होता, परंतु आज त्याच गोष्टीमुळे 265 भिक्षेकरी कष्टकरी होऊन गावकरी झाले आहेत...! अर्थात् हे सर्व श्रेय समाजाचं आणि त्यावेळी घडलेल्या घटनेचं... यात माझं कोणतंही श्रेय नाही... या सर्व घटनाक्रमानमध्ये मी स्वतःलाच तिऱ्हाइताप्रमाणे पहात होतो, ते हि काठावर बसून. माझ्याच बाबतीत घडत असलेल्या, या सर्व घटनांचा मी "प्रत्यक्ष साक्षीदार" इतकाच काय तो माझा सहभाग !!!
इतकं सर्व असलं तरीसुद्धा मी ती घटना अजून विसरलो नाही. अर्थात् चांगल्या अर्थाने...! 2019 नंतर मला जर कोणी पुरस्कार, सत्कार सन्मान यासाठी बोलावलं तर मी संयोजकांना विनंती करत होतो, की पूर्वी भीक मागणारे परंतु आता गावकरी झालेले, अशा काही लोकांना मी कार्यक्रमाला घेऊन आलो, तर चालेल का ? आपण त्यांनाही माझ्याबरोबर सन्मानित कराल का ? संयोजक आनंदाने होकार द्यायचे. आता मी माझ्यापुरता नवीन पायंडा पाडला आहे. माझा कुठेही सत्कार समारंभ असला, तर नव्याने निर्माण झालेल्या या "गावकरी" समाजाला मी माझ्यासोबत घेऊन जातो. दादा, ताई, आजी, मावशी, काका अशा शब्दांनी हाक मारत संयोजक, हाताला धरून मग माझ्या लोकांना पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेमध्ये सन्मानाने त्यांना बसवतात. माझा सन्मान करण्याआधी, माझ्या लोकांच्या अंगावर शाल टाकून, हातात श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना नमस्कार केला जातो. या हृद्य प्रसंगी कितीतरी वेळा माझे लोक भावना विवश होऊन अक्षरशः रडू लागतात. त्यांना तिकडे रडताना पाहून, स्टेजवरून हे सर्व पहात इकडे मी मात्र हसत असतो...
पाऊस पडण्यापूर्वी आभाळात काहीतरी हालचाली सुरू होतात... तसंच यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा थरथरू लागतात... इकडे ढग दाटतात आणि तिकडे डोळे...अस्सा मुसळधार पाऊस मग सुरू होतो...मी माती होऊन थेंब थेंब अंगावर झेलतो...दरवेळी हा पाऊस मला नव्याने भिजवतो..चिखलही मग माझा सुगंधित होतो... आभाळ कधी मीच होतो, कधी मी मातीच होऊन जातो...! बापरे...जुन्या गोष्टी सांगता सांगता, खूप वेळ झाला... बोलण्याच्या ओघात तुम्ही पण काही आठवण नाही करून दिलीत...तर, सांगायला खूप आनंद होतो आहे की, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे यांच्यातर्फे मला आणि डॉ मनीषा सोनवणे अर्थातच सोहम ट्रस्ट ला *ग्रामदेवता पुरस्कार* जाहीर झाला, 25 ऑगस्ट रोजी तो वितरित होणार होता. नेहमीप्रमाणे संयोजकांना हात जोडून मी विचारलं, "आमच्या गावकऱ्यांना" कार्यक्रमाला घेऊन येऊ का ? मोठ्या मनाच्या या पदाधिकाऱ्यांनी आनंदाने होकार दिला.
'कार्यक्रम कुठे असेल सर ? ' मी सहज विचारलं. संयोजक म्हणाले, 'न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे.... इथे आम्ही तुम्हाला अत्यंत मानाचा "ग्रामदेवता पुरस्कार" खूप मोठ्या माणसांच्या हस्ते देणार आहोत.' 'न्यू इंग्लिश स्कूलचा पत्ता माहीत आहे ना ?' संयोजक काळजीपोटी बोलले. न्यू इंग्लिश स्कूलचे नाव ऐकून, माझ्या पोटात गोळा आला... न्यू इंग्लिश स्कूलचा पत्ता मला कसा माहित नसेल...?"न्यू इंग्लिश स्कूल" माझी शाळा.... हो माझीच जिवाभावाची शाळा... आयुष्यातली मैत्रीण म्हणा, मावशी म्हणा, आई म्हणा... सर्व काही हि शाळाच होती...! पण, शाळेने त्यावेळी दिलेला पदर मला अंगावर ओढता आला नाही... खंत आहे मला याची....! आयुष्याच्या एका टप्प्यावर, याच शाळेत अनेक नको ते पराक्रम केले होते... प्रताप केले होते... मुख्याध्यापकांनी मला दहावीला न बसण्याचा निर्णय दिला होता... याच शाळेतून मला ब्लॅकलिस्ट सुध्दा केले गेले होते... ! आज तीच शाळा, पदरात "ग्रामदेवता पुरस्कार" घेऊन माझ्या पुढ्यात उभी होती...!आई पोरावर कितीही चिडली तरीसुद्धा ती प्रेमाने त्याला जवळ घेतेच... पदराखाली घालतेच... तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा नही... शिकवा नही.... और तेरे बिना जिंदगी भी जिंदगी नही... !
चंद्र रोज उगवतो, परंतु मध्ये पंधरा दिवसांची अमावस्या असते....
मी 1980 साली दहावी काठावर पास झालो होतो ... आज माझ्या शाळेने 2024 साली मला पुरस्कार देऊन पदरात घेतलं... अमावस्या पंधराच दिवसांची असते.... माझ्यासाठी हि अमावस्या 44 वर्षांची होती....!संयोजकांना भेटून कार्यक्रमाची माहिती घेतल्यानंतर, तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील, पूना बेकरी च्या पायरीवर बसून मी ढसाढसा रडलो होतो... प्रश्न एकच होता... माझीच अमावस्या एवढी मोठी का ??? यानंतर 25 तारीख उजाडली... माझ्याच शाळेत, "न्यू इंग्लिश स्कूल" मध्ये हा कार्यक्रम असावा याला योगायोग कसा म्हणू ??
संयोजकांनी माझ्या गावकरी झालेल्या कुटुंबाला दुसऱ्या नाही, पहिल्या रांगेत बसवलं...काका, मामा, मावशी म्हणत माझ्या या गावकऱ्यांचे त्यांनी सन्मान केले. यावेळी पाऊस बाहेरही होता , माझ्या मनातही होता.... तसा तो माझ्या लोकांच्या डोळ्यातही नेहमीप्रमाणे होताच... !
"ग्रामदेवता पुरस्कार"... मला आणि मनीषाला मिळाला. माझा जन्म खेड्यातला... माझं बालपण खेड्यातलं... गावात जर एखाद्याला "गावकरी" म्हणून राहायचं असेल, तर त्याला त्या गावातल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यावा लागतो, हे मी माझ्या लहानपणी ऐकलं होतं. मी माझ्या भिक्षेकर्यांना, गावकरी बनवतो आहे...
या वेळेचा हा पुरस्कार म्हणजे प्रत्यक्ष "ग्रामदेवतेने" दर्शन देऊन, आमच्या कामाला दिलेली संमती तर नसेल ? आशीर्वाद तर नसेल ? हा सुद्धा योगायोग नक्कीच नाही...! ग्रामदेवतेची प्रतिकृती माझ्या आणि मनीषाच्या हातात होती...मनोभावे नमस्कार करून मी ग्रामदेवतेला म्हणालो, 'आई जोगेश्वरी, भीक मागणाऱ्या लोकांना गावकरी बनवत आहे, "ग्रामदेवता" म्हणून त्यांना तुझ्या पदराखाली घे... घेशील ना गं ... ??? यानंतर ढगांमध्ये गडगडाट सुरू झाले... जोरदार पाऊस सुरू झाला... फरशीवर, जमिनीवर, झाडांवर, शेड म्हणून केलेल्या पत्र्यांवर, शाळेच्या गॅलरीत, गच्चीत पावसाचे टपोरे थेंब पडून एक विशिष्ट नाद झालेला ऐकू आला....
तथास्तु....तथास्तु....तथास्तु... !!!
26 ऑगस्ट 2024
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357







0 टिप्पण्या