रानभाजी - माठ

 

रानभाजी - माठ  

शास्त्रीय नाव : Amaranthus Palmeri

कुळ : Amaranthaceae

इंग्लिश : Carelessweed

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9 सप्टेंबर 2024 : माठ ही वर्षायू वनस्पती भारतात आढळते व पालेभाजी करिता लागवडीत आहे. हिचे हिरवा व तांबडा माठ असे दोन प्रकार आहेत. जगभरात उगवणारी ही एक वनस्पती आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते.

तांबडा माठ पुष्कळसा पोकळ्या सारखाच दिसतो. त्याची उंची १५० ते १८० सेंमी. असूनही खोड मऊ असते. हिरवा माठ ९० ते १२० सेंमी वाढतो. यास पांढुरकी छटा दिसते म्हणून त्यास पांढरा माठ असेही म्हणतात. परिदले व केसरदले प्रत्येकी तीन आणि फळे करंड्या सारखी असतात. बी फार लहान, काळे, चकचकीत व मसुरा सारखे असते. ही वनस्पती स्तंभक (आकुंचन करणारी), वेदनाहारक असून घशातील आणि तोंडातील व्रणावर गुणकारी असते.

लाल माठ ही भाजी लोहवर्धक आहे. ह्या भाजीत फोलेटचे प्रमाणही जास्त आहे. गर्भधारणेनंतर स्रीयांनी या भाजीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. फोलेट हे जीवनसत्व गर्भाच्या विकासासाठी आणि मुख्यत्वे जे मज्जासंस्थेशी निगडीत विकार टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान. केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, नखे तुटणे ह्या सगळ्या समस्यांचे निराकरणही ही भाजी खाल्यावर होते.

काटे माठ ही माठाची जाती कोठेही रुक्ष व ओसाड जागी उगवते. हिचा रंग हिरवा ते लाल किंवा जांभळा असतो. हिला पानांच्या बगलेत काटे व अनेक पसरट फांद्या असतात. परिदले व केसरदले प्रत्येकी पाच असतात. फळे द्विबीजी, इतर लक्षणे सामान्यपणे माठा प्रमाणे असतात. माठाची मुळे मासिक अतिस्त्राव, परमा, पोटशूळ, इसब इत्यादींवर उपयुक्त असून जनावरांना दूध कमी असल्यास डाळी बरोबर शिजवून ती खाऊ घालतात.

पाककृती

# साहित्य - १ मोठी जुडी लाल माठाची पाने चिरून, १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, ३ मोठे चमचे खवलेले खोबरे, १ मिरची छोटे तुकडे करून, १ मोठा चमचा बारीक ठेचलेली लसूण, १ छोटा चमचा जिरे, १ लिंबाचा रस, १ मोठा चमचा तेल, मीठ चवी प्रमाणे.

# कृती - लोखंडाच्या कढईत, एक मोठा चमचा तेल घालून कढई तापवत ठेवा. तेल तापले की, जीरे, मिरची आणि लसूण घाला. जीरे तडतडले की चिरलेला कांदा घाला. २ ते ३ मिनटे कांदा गुलाबी होई पर्यंत परता. आता यात बारीक चिरलेली लाल माठाची पाने घाला. मोठ्या आचेवर भाजी २ मिनटे परता. भाजी खूप आळेल. चवी नुसार मीठ घाला. भाजी शिजली की आचे वरून उतरून त्यात लिंबाचा रस आणि खोबरे घाला. चांगले ढवळून, गरम गरम भाकरी सोबत खायला द्या.

संदर्भ : विकासपीडिया

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या