रानभाजी - टाकळा
शास्त्रीय नाव - कॅसिया टोरा
कूळ - सिसालपिनेसी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 5ऑगस्ट 2024 : टाकळा ही वर्षायू वनस्पती सिसालपिनेसी म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटा पर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागा, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्या नंतर कॉफी सारखा वास येतो. ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. या वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याच बरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.
*पाककृती १
पदार्थ : कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद, गूळ इ.
कृती : पाने स्वच्छ धुऊन, पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा, मग त्यात ओली मिरची व हळद टाकावी. नंतर त्यावर बारीक चिरलेली भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली, की त्यात थोडा गूळ आणि मीठ घालावे. त्यावर ओले खोबरे घालावे. या भाजीत भिजवलेली तूरडाळ किंवा फणसाच्या आठळ्यांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चवदार बनते.
*पाककृती २
पदार्थ : दीड वाटी टाकळा पाला (कोवळा पाला देठे काढून चिरावा), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
कृती : जरा जास्त तेलावर कांदा, लसूण परतावे, त्यावर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. तिखट, मीठ, गूळ घालून शिजवून घ्यावे.
*पाककृती ३
पदार्थ - एक वाटी टाकळ्याची पाने, चिंचेचा कोळ व गूळ, हिरवी मिरची, मोहरी पूड, पाणी, मीठ इ.
कृती - पाने व मिरच्या सोबत वाटावे. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, मीठ घालावे. मोहरी पूड पाण्यात फेसून घालावी.
*पाककृती ४
पदार्थ : एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ.
कृती : कढईत तुपावर मिरची व पाने परतावीत. त्यात मिरे, जिरे घालून दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य मिक्सर मध्ये घालून वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी तंबळी उपयुक्त आहे.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या