रानभाजी - शेवगा
शास्त्रीय नाव : मॉरिंगा ऑलिफेरा
कुळ : मॉरिंगेशिए
इंग्रजी : ड्रमस्टिक
वृत्त एक सत्ता न्यूज
संग्रहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 7ऑगस्ट 2024 :
शेवगा ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारा हा वृक्ष १० मीटर उंची पर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. याला विदर्भातील झाडी प्रांतात 'मुंगना' असं म्हणतात. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.
औषधी गुणधर्म
रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्यांचे व्रण जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे.
शेवग्याच्या पर्णरसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे सर्व विकार बरे होतात.
शेवग्याच्या पर्णरसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते.
शेवग्याच्या पर्णरसाने माॅलिश केल्यास केसातील कोंडा जातो.
पिसाळलेले जनावर चावल्यास शेवग्याच्या पर्णरसात मीठ, काळी मिरी, लसूण, हळद यांचे मिश्रण पोटात घेणे, तसेच जखमेवर लावणे.
तोंड येणे, गळ्याची सुज, वांती, खरुज यात शेवग्याच्या पानाचा रस चोळणे, गुळण्या करणे, पिणे हे सर्वोत्तम. नसल्यास शेवग्याच्या पर्ण चुर्ण दररोजच्या भाजीत मिसळली तरी चालेल.
जेवल्यावर धाप लागणे, पोटात गॅस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, तोंडाची चव जाणे, कुपोषण आदि विकारांवर शेवग्याच्या पर्णरसाचे, पावडरचे पोषणमुल्य अनन्य साधारण आहे.
पोटातील वा स्नायूंचा वायुगोळ्यावर शेवग्याच्या पर्णरसात खडीसाखर मिसळून खाणे फायदेशीर ठरते.
पोटातील जखमा-व्रण, शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमी आदि विकारांवर शेवग्याच्या पर्ण भाजीला तोड नाही.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो.
शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो.
शेवग्याच्या पानात पीट्रिगोस्पेरमिन नावाचे कार्यकारी तत्त्व असते. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. त्यामुळे आतड्यातील व्रणास कारणीभूत असणाऱ्या एच पायलोरी या जीवाणूवर ते प्रभावी ठरते व आंतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते.
हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस आदी लक्षणे दिसू लागल्यानंतर शेवग्याची भाजी खावी. ही सर्व लक्षणे कमी होतात. शारीरिक आणि मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो.
शेवग्याचा पाला रक्तवर्धक व हाडांना बळकटी देणारा आहे. सर्व प्रकारच्या नेत्ररोगांमध्ये शेवग्याच्या पानांची भाजी लाभदायक ठरते.
शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजी सुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे.
शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे विपुल प्रमाणात असते. त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याची पाने आरोग्यवर्धक आहेत.
पानांची भाजी
शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन निथळून घ्यावा. नंतर पाने चिरून घ्यावीत. मूग डाळ एक तास आधी भिजत ठेवावी. नंतर निथळून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यावा. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व परतावी. परतल्यानंतर त्यात भाजी घालावी, मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी. शेवग्याचा पाला काहीसा तुरट कडवट चवीचा असतो मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो. शेवग्याच्या पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात.
पानांचा पराठा
साधारण एक मोठी वाटी भरून शेवग्याची कोवळी पाने घ्या. ती अगदी बारीक चिरून घ्यावीत. चार कप तांदळाचे पीठ घेऊन त्या पीठात पाने टाकावीत. तांदळाचे पीठ नसेल तर थोडी कणीक आणि थोडे ज्वारीचे पीठही वापरू शकता. पीठ भिजविताना त्यात थोडा चिरलेला कांदा, टाेमॅटो आणि कोथिंबीरही टाकावी. तिखटा ऐवजी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरल्यास चव अधिक चांगली होते. हे सगळे साहित्य एकत्र करून पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यावे. त्याचे पराठे लाटून तव्यावर भाजून घ्यावेत. पराठे अधिक चविष्ट होण्यासाठी भाजताना तव्यावर तूप सोडावे.
शेवगा फ्राय
साहित्य - शेवग्याच्या शेंगा पाव किलो, भाजलेले दाणे पाव वाटी, सुकं खोबरं किस पाव वाटी, १०-१२ लसूण पाकळ्या, ८-१० सुकलेल्या लाल मिरच्या, हळद, हिंग, लाल तिखट फोडणीसाठी, तेल थोडं जास्त, धणे जिरे पूड एक चमचा, गरम मसाला एक छोटा चमचा, मिल्क पावडर एक मोठा चमचा.
कृती - शेंगा धुवून, सोलून, तुकडे करून वाफवून घ्याव्या. मसाल्याचे साहित्य वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी करावी. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतवून घ्यावा. हळद, हिंग, तिखट, धणे जिरे पूड घालून परत परतवून घ्यावे. उकडलेला शेवगा घालून परत छान परतवून घ्यावे. मीठ, मिल्क पावडर आणि गरम मसाला घालून एक वाफ घ्यावी. शेवगा फ्राय तयार. रस फार करू नये. वाफलेला शेवगा आधी तेलात परतवून सुद्धा घेऊ शकता.
फुलांची भाजी
साहित्य - शेवग्याची फुले, एक किंवा दोन कांदे चिरुन, ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन, ३-४ हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो, हिंग, हळद, मिठ, अगदी थोडा गुळ, तेल.
कृती - शेवग्याची फुले धुवुन घ्यावीत. तेलावर लसुण पाकळ्या, मिरचीची फोडणी देउन त्यावर कांदा परता. कांदा जास्त शिजवण्याची गरज नसते. मग त्यात हिंग, हळद घालुन शेवग्याची फुले घाला. परतुन एक वाफ घ्या. मग त्यात चिरलेला टोमॅटो, मिठ, गुळ घाला. एक वाफ काढा आणि चांगले परतुन घ्या. झाली भाजी तय्यार.
शेवग्याच्या बियांचा उपयोग
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया

0 टिप्पण्या