‼️  चातक पक्षी  ‼️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/8/2026 :

मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांपासून सर्वांचेच डोळे ‘चातका’ सारखे आकाशाकडे लागलेले असतात. नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्याची दिशा आणि पावसाचा अंदाज हवामान खाते वर्तविते, पण त्याहीपेक्षा पारंपरिक पद्धतीने बांधला जाणारा मान्सूनचा अंदाज अधिक खरा ठरतो. तसं पाहिलं तर या पारंपरिक पद्धतींना कसलाही शास्त्रीय आधार नाही, पण विज्ञानापेक्षा हे अंदाज भरवशाचे असतात असे म्हटले जाते. 

पावसाची चाहूल आपल्याला सर्वात पहिल्यांदा चातक पक्षी देतो. पाऊस वेळेत पडणार असल्यास चातक पक्ष्यांचे आगमन अचूक वेळेत होते. त्यांचे आगमन लांबल्यास पाऊसही लांबतो. चातक पक्षी ‘पिऊ पिऊ’ या सांकेतिक आवाजात ओरडल्यास समजावे पावसाचे दिवस जवळ आले. खरंतर चातक हा पक्षी तहान भागवण्यासाठी फक्त पावसाचे थेंब चोचीत झेलून पितो, बाकी कोणतेही पाणी तो पीत नाही. त्यामुळे तो स्वतःच पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो.

प्रत्यक्षात चातक म्हणजे पाइड कक्कू, हा कोकिळेच्या जातकुळातील पक्षी. पाइड म्हणजे काळा पांढरा. याचे नवीन नाव जॅकोबीयन कक्कू, तर शास्त्रीय नाव क्लॅमाटोर जॅकोबीनस. क्लॅमाटोर हा लॅटीन शब्द ‘क्लॅमर’ म्हणजे दंगेखोर किंवा आरडाओरड करणारा आणि ‘जॅकोबीन’ हा शब्द युरोपातल्या फ्रेंच रिव्हॉल्यूशन संबंधी आहे. आफ्रिकेतून स्थलांतर करून आलेले हे पक्षी पावसाळ्याच्या तोंडावर कोकणासह पश्चिम घाटात उत्तरेस पसरतात. इतक्या लांबच्या प्रवासाने थकून आलेले हे पक्षी बऱ्याचदा कावळे मागे लागल्यामुळे जखमी अथवा थकलेल्या अवस्थेत मनुष्यवस्तीत आढळतात. 

चातक पक्ष्याला पावसाळी पाहुणा म्हणूनही संपूर्ण राज्यात तसेच मध्य भारतात ओळखले जाते. लांब शेपटी, सुंदर तुरा, रंगाने काळा पांढरा, शेपटीचे पांढरे टोक असा आकाराने मैनेसारखा हा पक्षी दिसतो. त्याच्या पंखाखाली असलेल्या गोलाकार पांढरा डाग तो उडताना स्पष्टपणे दिसतो. चातक हा कोकिळेच्याच जातकुळातील असल्याने तोही घरटे बनवत नाही. त्याऐवजी तो जंगलातील इतर पक्ष्यांच्या घरट्यातून त्यांची अंडी खाली पाडतो आणि तिथे स्वत:ची अंडी घालतो. 

कोकिळेचे हे साधारण ७-८ भाऊबंध पावसाळ्यात कोकण, ठाणे जिल्ह्याच्या परिसरात पाहायला मिळतात. युरेशिअन कक्कू, इंडियन कक्कू, ड्रँगो कक्कू, बँडेड कक्कू, ग्रे बेलिड कक्कू हे त्यातील काही. हे सगळेच पक्षी गाणारे पक्षी आहेत. बऱ्याचदा आमराया, बागात गर्द झाडीत लपून हे पक्षी स्वरकुंजन करत असतात. झाडांच्या गर्दीत बसल्याने बऱ्याचदा हे पक्षी ओळखता येत नाहीत, मात्र त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाजच त्यांची ओळखून पटवून देतो.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : दैनिक नवकाळ