कामाठीपुरा प्रकरण 2️⃣0️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/8/2026 :
*आज शनिवार. पहिल्यांदा सकाळ खूप प्रसन्न वाटली चिनूला. काल शुक्रवारची रात्र अगदी शांततेत पार पडलेली. बाप पुन्हा संध्याकाळी गेलेला प्यायला, आला आणि रात्री गपगार निजला. तसा बाप दारू पिऊन येऊन थोडंफार करवादायचा पण चिन्याने नजर टाकल्याबरोबर ठस्सी व्हायचा. बाप झोपला नि घरचे सारे शांत निजले.*
काल रात्री झोपताना पहिल्यांदा चिनुला राधाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. त्याने ठरवलेलं, उद्या पुन्हा फिल्डिंग लावायची.
साडे सहाच्या ठोक्याला तो गल्लीच्या तोंडाशी हजर.
फिल्डिंगच्या वेळेच्या त्या सीनचा तो टाइम पण पार पडला. सात वाजले. शाळा भरल्याची ती कर्कश बेल पण झाली. 'जन गण मन' पण झालं. चिनू गोंधळला.. आरे बाप रे हे काय झालं, कोणंच कसं नाही आलं?
चिनूला जिम, रोहिदास सर आठवले. पळत सुटला तो जिमच्या दिशेने... पण डोक्यातून राधा काही जाईना.
शनिवार...
आज 'हाफ डे' होता शाळेला. शाळा साडे दहा वाजता सुटणार होती. चिन्याला त्याच वेळेला त्याच्या शाळेत जायचं नव्हतं, म्हणजे सकाळी शाळा सुटल्यावर त्याला राधा आणि कंपनी शाळेत आलीत किंवा नाहीत हे बघायला वेळच वेळ होता.
चिनू दहा वाजताच शाळेच्या गेटसमोर असलेल्या पापलेटच्या घराच्या बाकड्यावर बसला.
'आज शाळा नाय कारे?' पासकीन मामाने त्याला विचारले.
'वेळ आहे मामा... दुपारी निघेन' त्याने पासकीन मामाला सांगितलं.
साडे दहाला शाळा सुटण्याची बेल झाली. मुलं गेटबाहेर सुसाट धावत सुटली.
चिन्या डोळ्यात प्राण आणून एकेकाला न्याहाळत होता.
अचानक चिन्याच्या डोळ्यात चमक उमटली... ओळखीच्या एकामागून एक येत्या झाल्या.
सहा जणी. मस्तपैकी गोंगाट, गलका करीत, एकमेकींच्या वेण्या खेचीत, एकमेकींना चिडवत, हसत, खिदळत गेटच्या बाहेर आल्या.
राधाचं त्या गर्दीतलं वेगळंपण उठून दिसत होतं. परीकथेतल्या परीसारखी दिसत होती राधा. सुंदर. तेवढीच फ्रेश जशी सकाळी दिसायची. सूर्याच्या किरणांनी तिच्या सौंदर्यात अलौकिक जान आणलेली. सुखाची, लाडाची झळाळी तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होती.
हिचा बाप किती चांगला असेल नाही! बेवडा तर नक्कीच नसणार. टिपिकल राजस्थानी मारवाडची वाटतेय. बापरे... ते लोक तर किती श्रीमंत असतात! असल्या विचारांचं काहूर मनात घोळवत चिनू तिच्याकडे एकटक बघत होता.
अचानक त्यातल्या एकीचं लक्ष हाताची घडी आणि ओठांवर स्मितहास्य घेऊन त्यांना पाहणाऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या चिनूवर गेलं
त्यांच्यात चलबिचल झाली. एक जण राधाच्या कानात कुजबुजली. साऱ्यांनी चालण्याचा वेग वाढवला. राधा सगळ्यात पुढे. चिनू त्यांना अडवण्याअगोदर त्या गल्लीतून पसार झाल्याही.
चिनू गल्लीच्या बोळाशी थबकला. विचार करू लागला 'आयला म्हणजे ह्यांनी सकाळी शाळेला येण्याचा रस्ता बदललाय तर... पोपट बनवलंय मला.. सकाळी रस्ता बदलतात आणि दुपारी मी नसतो तेव्हा ह्या नेहमीच्या शॉर्टकटने सटकतात.
अच्छा असं आहे तर! पण सकाळी येत कुठून असाव्यात?' ह्या सगळ्या सकाळी येत कुठून असाव्यात ह्या गोष्टीचं वादळ चिनूच्या डोक्यात घोंगावायला लागलं.
शाळेला यायला तीन मार्ग होते. एक तर सातव्या गल्लीचा शॉर्टकट दुसरा, पाचव्या गल्लीतून मुस्लीम मोहल्ला पार केल्यानंतरचा, पण हा मार्ग सहसा कुणी पसंत करत नसत. तिसरा दहावी गल्लीतून पार सातवी, आठवी, नववी, दहावी गल्लीच्या तेलुगु मुनुरवार वाडीला, दर्ग्याला आणि लांबड्या चाळीतल्या बौद्ध विहाराला प्रदक्षिणा घातल्यानंतर येणारा लांबचा मार्ग ह्यांना शाळा गाठण्यासाठी परवडण्याजोगा नव्हता.
‘मग ह्या येतात कुठून आणि ह्यांनी रस्ता का बदलला? आपल्यामुळे तर नाही ना.. पसंत नसेल करत आपल्याला... सोड जाऊदे ना. पण ह्या येतात कुठून हे बघायला पाहिजे. उद्या रविवार... एक दिवस थांबावं लागेल' एक दिवसाचा विरह ह्याचा जीव घेऊन गेला.
रविवार...
चिन्याच्या बापानं बाजारातून पाव किलो मटण आणलेलं. उधारीवर. त्यात बाव कमी नि चरबी, डील, फुफुसाचे तुकडे मुबलक. आई मटणात बटाट्याची भर टाकायची. प्रत्येकाच्या वाट्याला दोन बटाट्याच्या फोडी आणि दोन बारकुशे बाव येत.
रविवारी बाप देशी घेऊन घरीच बसायचा.
पाव किलोतले अर्धे बाव त्याच्या चाखण्यातच संपायचे. बाप रश्यात भाकरी कुस्करून भुरकायचा 'मच मच' आवाज करीत. दुपारी झोपाझोप. मग सगळ्या बायका संध्याकाळी बाहेर बाकड्यावर बसत. आईला बाकड्यावर बसायची परवानगी नव्हती. कुणीतरी तिच्यावर लाईन मारेल म्हणून.
माई कपड्यांना इस्त्री करायला बसायची. दुपारचं जेवण तेच रात्रीचं जेवण
असायचं. सरप्राईज म्हणजे आई मांदेलीच्या दोन-दोन पाकळ्या ताटात वाढायची.
बाप नेहमीप्रमाणे जेवला, मुतला मोरीत, आडवा झाला कॉटवर काही राडा झाला नाही आज.
सगळे गोधड्या पांघरून झोपेच्या कुशीत शिरले. आज ह्या सगळ्या भावंडांचं एकत्र झोपणं खूपच उबदार होतं. स्वर्गाहून सुंदर. सगळ्यांना झोपेने कुशीत घेतलं. चिनू मात्र काचेच्या कौलातुन दिसणारा चंद्र न्याहाळत होता. चिन्याला सोमवार उजाडण्याची घाई झालेली.
चिनू चोख सकाळी साडे पाचला उठला. तसा तो झोपलाच नव्हता रात्रभर.
भराभरा आवरून जिमची बॅग खांद्याला लटकवून तो गल्लीकडे धावत सुटला. आज त्याला टायमिंग किंवा फील्डिंग लावायची नव्हती. सरळ धावत तो सातव्या गल्लीच्या तोंडावर आला. तिथून तो पाचव्या गल्लीच्या नाक्यावर दूध केंद्राच्या आडोशाला उभा राहिला. तिथून त्याला पहिली गल्ली ते दहावी गल्लीपर्यंतचं स्पष्ट दिसत होतं.
सहा वाजून दहा मिनिटे झाली. शाळेतली मुलं हळूहळू दिसायला लागली. तो श्वास रोखून पाहू लागला.
त्या ग्रुपमधली एक सहाव्या गल्लीतून बाहेर पडली. दोघी सातव्या गल्लीतून निघाल्या. चिनू उभा असलेल्या दूध केंद्राला घसटून गेल्या.
त्या तिघी जणी आता पाचव्या गल्लीच्या नाक्यावर कुणाची तरी वाट बघत उभ्या राहिल्या. तितक्यात तिसऱ्या गल्लीतून दोघी जणींसोबत राधा येताना चिनूला दिसली.
ओ.....हो..... पहाटेची लालिमा राधेच्या चेहऱ्यावर पसरलेली. सूर्य जणू आतुर झालेला राधेला बघायला. चिनू भान हरपून तिला बघू लागला.
त्या सहा जणी पाचव्या गल्लीच्या नाक्यावर उभ्या काहीतरी कुजबुज चाललीय त्यांची. ती चिनूचा धक्का लागलेली मुलगी त्या शॉर्टकटच्या दिशेने सगळ्यांना निघायला विनवतेय, नेहमी येणाऱ्या दिशेकडे बोट दाखवून. राधा तिच्यावर डाफरून 'नको नको इथूनच जाऊया' म्हणतेय. त्यातल्या आणखीन दोघीजणी राधाचा हात धरून तिकडूनच जाऊया म्हणत सातव्या गल्लीच्या दिशेने तिला खेचण्याचा प्रयत्न करताहेत. राधाने त्यांचा हात झटकला. ती उरलेल्या दोघींसोबत पाचव्या गल्लीच्या दिशेने चालू लागली तशा त्या तिघीही नाईलाजाने राधेसोबत चालत्या झाल्या.
चिनू वळला. सातव्या गल्लीच्या दिशेला धावला. गल्लीतून बाहेर येऊन तो लट्याच्या झोपडीपाशी आला. झोपडीला लागून असलेल्या वडाच्या झाडाच्या आडोशाला उभा राहून तो पुढील गंमत बघू लागला.
त्या सहा जणी थोड्याशा चिडलेल्या अवस्थेत त्याला समोरून येताना दिसल्या. चाळीजवळ आल्या. त्यातल्या एकीनं चिनूच्या घराकडे पाहिलं नि ती दुसरीच्या कानात काहीतरी पुटपुटली. चिन्याने पाहिलं ' बाप रे... ह्यांना माझं घर पण माहीत आहे' चिनू मनात पुटपुटला.
त्या सहाजणी थोड्या पुढे आल्या नि चिनू हाताची घडी, चेहऱ्यावर स्मित आणि पाय क्रॉस ठेवीत सुनील गावस्करच्या स्टायलीत त्यांच्यासमोर उभा ठाकला. राधाने पाहिलं त्याला सगळ्यात आधी.
ती थबकली तशी साऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. राधा सोडून सगळ्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटलं.
'गुड मॉर्निंग' चिनू मधमिश्रित हास्यात अलवार कुजबुजला.
धक्का लागलेल्या मुलीने आणि आणखीन दोघींनी तितक्याच अलवार पणे 'गुड मॉर्निग' म्हणत त्याला रिप्लाय पण दिला.
शाळेच्या गेटजवळ गेल्यावर राधाने चिनूकडे ओझरतं पाहिलं... खुन्नस होती त्यात.
'येस्स' म्हणत, दोन्ही हात स्वत:कडे खेचत, मुठी आवळत चिन्या किंचाळला.
चुलीवर भाकऱ्या करणाऱ्या भाभीने मागे वळून लाजत हसुन पाहिलं. पासकीन मामा भज्जी तळत स्वतःशीच हसला, पापलेट भावज्याने मशेरी घासत चिन्याला डोळा मारला. कुंदा मावशी नळावर कपडे धुवायचे सोडून त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसू लागली.
चिनू लाजला. तडक बॅग सांभाळत धूम ठोकली त्याने जिमच्या वाटेने.
नेक्स्ट डे ...
कालच्यासारखा आज पण चिनू दूध केंद्राच्या आडोशाला उभा राहिला. साऱ्या जणी जमल्या. राधा आली.
पुन्हा तिचं ते सुवर्ण लालिमा ल्यालेलं सौंदर्य बघून सूर्याप्रमाणे तो कासावीस झाला.
आता मात्र त्यांच्यात काहितरी महत्वाची चर्चा घडून साऱ्यांनी सातव्या गल्लीकडे चालण्याची तयारी केली. सातव्या गल्लीच्या दिशेने त्यांना जाताना पाहून चिनू पाचव्या गल्लीतल्या किशोर गवळीच्या वाड्याकडून सरकून पुन्हा त्याच, नेहमीच्या बोळापाशी टायमिंग लावून उभा राहिला.
चिन्या पोजिशनमध्ये उभा राहिला.
‘अजून कशा येत नाहीत... इतक्यात यायला हव्या.' स्तब्ध उभा चिनू स्वताशी आडाखे बांधतोय.
इतक्यात...
इतक्यात समोरून दोघी धावत धावत चिनूच्या छातीशी धडकल्या.
एकीने चिनूला पहाताच टाहो फोडला 'भाई देखो... राधा को पकड रक्खा है उस हैवान ने... जबरदस्ती कर रहा है वो उसके साथ' चिनूचा हात पकडत ती म्हणाली.
‘कौन... क्या हुवा... कहा है राधा?'
'वो... उधर... वहां' तिने रडत त्या दिशेकडे बोट दाखविले.
चिन्या सुसाट धावला.
अल्ताफ काल्याने राधाचा हात धरलेला..
'ए काल्या छोड गांडू...' म्हणत लांबून धावत येत पिसाटल्यागत चिनू गरजला. चिनूला बघताच काल्या हडबडला. त्याने राधाचा हात सोडला. तिला जोरात ढकलून काल्या आणि त्याचा साथीदार भिंतीवरून उडी मारून पसार झाले.
चिनू धावला, भिंत काबीज केली पण त्या आधी त्याला राधा पडलेली दिसली. त्या दोघांचा पिच्छा सोडून तो माघारी वळला.
राधेच्या पुढ्यात आला तो.
राधा जमिनीवर बसून हातात तोंड लपवून हमसून रडत होती. तिचे पांढरे शुभ्र कपडे मलीन झालेले. दप्तर अस्ताव्यस्त पडून त्यातून पुस्तके बाहेर पडलेली. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, सारं काही जमिनीवर विखुरलेलं. हे सगळं बघुन चिनु हादरला. धक्का लागुन पडलेली राधा उठत, रडत सगळं आवरत होती.
चिनू तिच्या पुढ्यात नि:शब्द उभा.
‘मै इसको रोज बोलती थी, वो मोहल्लेसे कभी नै जानेका कितनी गंदी नजरोसे देखते थे वो लोग, और कितना गंदा गंदा बोलते थे. बात नही मानी इसने मेरी... देखा अब क्या हुवा’ धक्का लागलेली ती चिनूला पडलेलं सामान राधेच्या दप्तरात टाकताना सांगतेय.
'हे भगवान कितने गंदे लोग है यहाँके' राधा भानावर येत म्हणाली. तिला हुंदका आवरत नव्हता. चेहरा लालेलाल झालेला. काजळलेल्या टपोऱ्या डोळ्यातून पारदर्शी मोती टपकत होते.
ह्या एकेका मोत्याची किमत वसूल करणार होता चिनू अल्ताफ काल्याकडून. ‘हम यहां पढने आते है, ना कि इनके हवस का शिकार होने.' राधाला हुंदके अनावर होत होते.
चिनूने पाण्याची बाटली तिच्यासमोर धरली.
'तुम हि हो जिसकी वजहसे हमें ये झेलना पडा.. तुम्हे टालने के लिये हम वहाँसे आया करते थे... दरींदे मिलते है सब जगह... बोलो हम पढाई छोड दे क्या?... बोलो?’ चिनूच्या डोळ्यात रोखून राधा गरजली. तिची बोटं त्याच्या टी शर्टात रुतून त्याच्या छातीचा वेध घेत होती. तिच्या डोळ्यातले ओघळणारे अश्रू चिनूचे काळीज चिरून गेले.
चिनू थरकापला तिच्या डोळ्यातला अंगार बघून.
शाळेची बेल वाजली... शाळेत जाण्याच्या मूडमध्ये कुणीच नव्हते.
दोघींनी राधेला खाली बसवलं. ती पाणी प्यायली. एकीनं तिला रुमाल दिला. डोळे पुसले राधाने.
‘बाबा को बताना पडेगा... आज हाथ पकड़ा है कल कुछ भी हो सकता है... पुलिस कम्प्लेन करनी होगी' राधा निर्धाराने उठली. तिनं बॅग झटकली. त्या सगळ्या निघाल्या.
‘रुको... ये सब मेरी वजहसे हुवा है ना? मुझे एक मौका दो प्लीज... मै प्रॉमिस करता हुं आजके बाद गली, मोहोल्ला क्या कामाठीपुरा का कोई भी बंदा तुम्हे आंख उठाकर नही देखेगा... मै भी नही.. एक चान्स दो. बादमे जो करना है कर लीजियेगा' चिनू हात जोडत खाली मान घालून म्हणाला.
त्यांनी चिनूकडे पाहिलं.
राष्ट्रगीत संपलं होतं. कर्कश बेल वाजली. सगळ्या शाळेच्या दिशेने निघाल्या. चिनू मटकन खाटेवर बसला.
अल्ताफ काल्याला उचलायचं... आणि आजच... असं काहीसं पुटपुटला.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश.. पुढे... प्रकरण २१
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या