ई 20 धोरणाची चिरफाड, नितिन गडकरी जागे होणार का??

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/07/2026 :

 आज भाजपाच्या महाराष्ट्रातील ऑफिशियल सोशल हॅंडल वरुन नितिन गडकरी यांच्या ईथेनॉल धोरणाचे समर्थन करणारा लेख आला आहे त्यामुळे यावर भाष्य आवश्यक. 

मुद्दा क्रमांक 1 – ईथेनॉल हे पेट्रोल पेक्षा अधिक उच्च दर्जाचे इंधन आहे. त्यामुळे त्याचा वापर जर इंजिन मध्ये होणार असेल तर त्यासाठी उच्च compression ratio असणारे इंजिन हवे. म्हणजे तुम्हाला धांसू पिक अप आणि उच्च परफॉर्मन्स मिळू शकतो. 20 % ईथेनॉल मिसळून जुनेच इंजिन वापरणार असाल तर तुम्ही इंधन वाया घालवत आहात आणि त्यामुळे हे 20 % ब्लेंडिंग तुमच्या गाडीचा average 5 ते 10 % कमी करू शकते. 

जर सरकारला हे ईथेनॉल मिसळायचेच असेल तर त्यांना पुढील 20 वर्षांचा रोड मॅप दिला पाहिजे जेणेकरून कार आणि दुचाकी उत्पादक कंपन्या असे इंजिन्स बनवायला घेतील. 

प्रश्न क्रमांक 1 – सरकारने असा 20 वर्षाचा रोड मॅप जाहीर केला आहे का ? गाड्या बनवणार्‍या कंपन्यांना दिला आहे का ??? 

मुद्दा क्रमांक 2 – ईथेनॉल हे solvent आहे. त्यामुळे ते पेट्रोल मध्ये मिसळले की तुमची पेट्रोलची टाकी लवकरच गंजू शकते. लवकर म्हणजे 5-10 वर्षात तिची वाट लागू शकते. खार्‍या हवामानात अधिक लवकर वाट लागेल. 

ईथेनॉल हे solvent आहे त्यामुळे पेट्रोल ची टाकी ते इंजिन पर्यंतची जी काही यंत्रणा आहे. पाइप , कार्बोरेटर , फ्युल इंजेक्टर ही जी काही यंत्रणा आहे त्यात तुम्ही रबर , प्लॅस्टिक किंवा Teflon वापरू शकत नाही कारण ईथेनॉल यांना हळू हळू विरघळून टाकू शकते. 

प्रश्न क्रमांक 2 – हे सत्य सरकार मान्य करणार आहे का ? आता रस्त्यावर असलेल्या गाड्यांच्या पेट्रोल टाक्या खराब होऊ नये म्हणून सरकार आणि गाडी बनवणार्‍या कंपन्या काय करणार आहेत ?? 

पेट्रोल टाकी ते इंजिन मधली संपूर्ण यंत्रणा रबर , प्लॅस्टिक आणि Teflon मुक्त करण्यासाठी सरकार आणि गाडी बनवणार्‍या कंपन्या काय करणार आहेत ?? या साठी किट बनवणे आणि ते शो रूम मध्ये बसवून देणे याचा राष्ट्रीय कार्यक्रम न सुरू करता तुम्ही ई20 धोरण आणणार असाल तर यात ग्राहकांचे जे नुकसान होणार आहे त्याचे काय ??? 

मुद्दा क्रमांक 3 – परवा मी जुन्नर मध्ये एका जेष्ठ प्रगतिशील शेतकर्‍याला भेटलो होतो. ते एकरी 100 टन उस उत्पादन करतात. त्यांनी महाराष्ट्र मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी सेमिनार घेऊन शेतकर्‍यांना एकरी 100 टन उस उत्पादन कसे करावे याची कला शिकवली आहे.  त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली. तीन वर्ष उसाचे उत्पादन घेतल्यावर ते एक सोयाबीनचे पिक घेतात , मग कांद्याचे पिक घेतात , परत सोयाबीन आणि परत एकदा कांदा. अशी दोन वर्षे भिन्न पिके घेऊन त्यानंतर ते पुन्हा उस लावतात. यामुळे जमिनीचा कस कायम रहातो. 

प्रश्न क्रमांक 3 - सरकारने ईथेनॉल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेताना प्रत्येक शेतकर्‍याकडे हे पिक रोटेशन चे ज्ञान पोचवले आहे का ?? याची अंमलबजावणी होते आहे याची सरकार किंवा साखर कारखान्यांनी काही तपासणी केली आहे का ??? 

शेतकर्‍यांना हे ज्ञान न देता जर नगदी पिक म्हणून शेतकरी सातत्याने उस लावू लागले आणि त्यामुळे जमिनी नापीक झाल्या तर त्याची जबाबदारी सरकार घेणार आहे का ? 

मुद्दा क्रमांक 4 – ईथेनॉलचा वापर वाढल्याने शेतकर्‍यांचा आर्थिक लाभ होईल असे सरकार म्हणत आहे. सरकारने उसाचे आधारभूत मूल्य काढताना त्यांना वेगळा ईथेनॉल बोनस देण्याचा आदेश काढला आहे का ? कारखाने असा बोनस देत आहेत का ?? अन्यथा फायदा कारखाने उचलतील शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसतील. 

प्रश्न क्रमांक 4 – सरकारने या संदर्भात काही अध्यादेश काढला असेल आणि त्याचे पालन होत असेल तर त्याची माहिती कोणी देईल का ? 

प्रश्न क्रमांक 5 – यामुळे परकीय चलन वाचेल असा सरकारचा दावा आहे. क्षणभरासाठी तो मान्य केलानेमके किती परकीय चलन वाचणार आहे याची आकडेवारी सरकार घोषित करेल का ??? 

प्रश्न क्रमांक 6 – जर परकीय चलन वाचणार आहे आणि जर सरकार ला ईथेनॉल स्वस्त पडणार आहे तर ई20 फ्युल चा दर सामान्य पेट्रोल पेक्षा सरकार किती कमी ठेवणार आहे ??? जर सरकारची बचत होणार असेल तर त्याचा लाभ सामान्य नागरिकांना सुद्धा मिळालाच पाहिजे. 

प्रश्न क्रमांक 7 –वाहन उद्योगाला ई20 इंधंनासाठी त्यांच्या इंजिन मध्ये , ट्रान्समिशन सिस्टिम मध्ये जे बदल करावे लागणार आहे त्याला निश्चितच काही कालावधी जाणार आहे. तितका काळ सरकार लोकांना दोन्ही इंधन वापरण्याचा पर्याय का म्हणून उपलब्ध करून देत नाही ?? 

आपल्या गाडीची वाट लावून घेऊन ई20 इंधन वापरुन देशभक्त व्हायचे का जोवर ई20 compatible गाडी घेत नाही तोवर शुद्ध पेट्रोल वापरुन देशद्रोही व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार तरी सामान्य नागरिकांना असू द्या की....

अनिल गगनभेदी ठाणे

महेंद्र कुंभारे

====================