हरंगुळ–पुणे व दौंड–कलबुर्गी रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा रद्द; आता कायमस्वरूपी धावणार ; खा. धैर्यशील मोहिते-पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/05/2026 :
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ–पुणे तसेच करमाळा–माढा तालुक्यात लोकप्रिय असलेल्या दौंड–कलबुर्गी या रेल्वे गाड्यांचा विशेष (स्पेशल) दर्जा रद्द करण्यात आला असून, या दोन्ही गाड्या आता कायमस्वरूपी धावणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. यामुळे या गाड्यांचे तिकीटदरही सुमारे निम्म्यावर येणार आहेत.
जेऊर, कुर्डूवाडी, माढा या स्थानकांवरून सोलापूरला सकाळच्या वेळेत जाण्यासाठी पुरेशा गाड्या नव्हत्या. सकाळी साडेपाचची एक गाडी आणि त्यानंतर थेट दुपारी बारा वाजताची गाडी उपलब्ध होती. सकाळी ७ ते ८ दरम्यान सोलापूरसाठी गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. यासाठी दौंड–कलबुर्गी गाडी सुरू करण्यात आली होती; मात्र काही काळानंतर ती बंद झाली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार मोहिते-पाटील यांनी सोलापूर येथील डीआरएम कार्यालयात बैठक घेऊन ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही गाडी कायमस्वरूपी करण्यात आली असून, गाडी क्रमांकापुढील ‘०’ काढण्यात आले आहे. त्यामुळे तिकीटदरातही घट होणार आहे.
दरम्यान, लातूर व धाराशिव जिल्ह्यातून पुण्याकडे दुपारच्या वेळेत थेट रेल्वे सेवा नव्हती. प्रवाशांच्या मागणीनुसार हरंगुळ–पुणे गाडी दुपारी ३ वाजता लातूरहून सुटून रात्री पुण्यात पोहोचत होती. या गाडीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, तिकीट सतत वेटिंगमध्ये असायचे.
खा. मोहिते-पाटील यांनी लोकसभेत ही गाडी कायमस्वरूपी करण्याची तसेच हडपसर ऐवजी पुणे स्टेशनपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करत गाडी कायमस्वरूपी केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

0 टिप्पण्या