भाग्य कुणाला लाभे ऐसे?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
आपण कशाला भाग्य समजतो. ज्याचे हातून मनोभावे सेवा घडत आहे, ही खरी भाग्याची गोष्ट आहे. "भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा | निकटवास बरा संतापायी |" आपणास धन प्राप्त होणे, मनासारखी पत्नी प्राप्त होणे किंवा वैभव प्राप्त होणे हे काही भाग्याची गोष्ट नव्हे. ज्यांना संतसंग घडत असेल त्याला खरे भाग्य म्हणावे. आज सामान्य जीव भाग्याची अशी व्याख्या करतो की, जो खूप श्रीमंत व्यक्ती आहे. झोपेतून 11 वाजता उठतो. त्याला भाग्यवंत म्हणतो. एक व्यक्ती म्हणाला महाराज तो तर 12 वाजेपर्यंत झोपतो त्याला काय कमी आहे. तोच तर खरा भाग्यवंत असायला हवा. राष्ट्रसंताची ग्रामगीता सांगते.
तो तर निजलाची राहतो, झोपूनची खातो पितो |
काय अधिक भाग्यवान म्हणवितो? सांगा सांगा ||
भाग्यवंताची उलटी व्याख्या, करणे शोभते का शहाण्या सारख्या |
अरे सकाळी उठणारासची सख्या, भाग्यवंत म्हणावे ||
सर्वांनी सकाळी उठावे. उशिरापर्यंत झोपू नये. सकाळी तर कोंबडा उठतो आणि बाग देतो, मग कोंबडा भाग्यवंत आहे का? मुळीच नाही. जो मनुष्य प्राणी सकाळी उठतो व परमेश्वराचे चिंतन करतो तोच खरा भाग्यवंत होय.
भाग्य कुणाला लाभे ऐसे?
सत्गुण कार्या वेळ जातसे ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, खरे भाग्यवान तेच आहेत, ज्यांचे आयुष्य सत्कृत्ये आणि उत्तम गुणांचा अवलंब करण्यात व्यतीत होते. केवळ पैसा किंवा ऐश्वर्य असणे म्हणजे भाग्य नाही. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात व्यसने नाहीत, जो लोकांशी नम्रपणे वागतो, ज्याचे मन नामस्मरणात आणि निर्मळ स्वभावात मग्न असते, तोच खरा भाग्यवान होय. चांगली कर्मे करून आयुष्य सार्थकी लावणे म्हणजेच भाग्य.
कधी नच घडते व्यसनाधीनता, जो जो भेटे त्यासी नम्रता |
चित्त रंगले नामस्मरणी, निर्मळ-सरळ-स्वभाव जयाचे ||1||
व्यक्ती कधी कधी नकळत व्यसनाच्या मागे लागतो. दारू, गांजा, सिगारेट, गुटका, तंबाखू याची सवय व्यक्तीला लागते. व्यसनाधीनता ही केवळ एक वाईट सवय नसून तो मेंदूचा एक आजार आहे. व्यसनाधीनता सोडून आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी ती लहान असो वा मोठी, श्रीमंत असो वा गरीब त्यांच्याशी अत्यंत नम्रपणे, आदराने आणि प्रेमाने वागावे. अहंकार सोडून सर्वांना समान मानणे आणि बोलण्यात व वागण्यात शालीनता ठेवावी. नामस्मरणात चित्त रंगण्याकरिता चित्त एकाग्र करावे. नामचिंतन करीत असताना मनात अनेक विचार येतात, त्या विचाराच्या मागे जाऊ नये. त्या विचारांना फाटे फोडून वाढवू नयेत. चित्त एकाग्र होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. ज्यांचे मन काचेसारखे स्वच्छ आणि वागणे सरळ असते, त्यांना निर्मळ सरळ स्वभावाचे म्हटले जाते. मनात कोणताही द्वेष, ईर्षा न करता जेव्हा आपले मन दुसऱ्याचे शुभचिंतन करील तेव्हा आपल्या जीवनात शांती निर्माण होईल. निर्मळ मन हेच देवाचे घर मानले जाते. बाह्य जगाशी निस्वार्थ आणि पारदर्शकपणे वागावे.
अंतर्बाह्य शुध्द राहणी, मर्यादेची प्रेमळ वाणी |
सकळ कळे परि गर्व न अंगी, कर्ण न घेती दोष कुणाचे ||2||
अंत:करणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा. सर्व रक्षणिय वस्तूपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण करा कारण त्यात जीवनाचा उगम आहे. अंतर्बाह्य शुद्ध राहणे म्हणजे शरीर (बाह्य) आणि मन, विचार (आंतरिक) या दोन्ही पातळ्यांवर पवित्रता व स्वच्छता राखणे होय. हे शरीर व इंद्रिये निरोगी ठेवणे आणि मनातील लोभ, क्रोध, कपट दूर करून विचारांची शुद्धता, आंतरिकता टिकवावी, ज्यामुळे व्यक्ती आत्मविकासाकडे जाते. मर्यादेची प्रेमळ वाणी असणे म्हणजे आदर, सभ्यता आणि नैतिकतेची सीमा ओलांडून, समोरच्यांच्या भावनांचा मान राखून प्रेमाने संवाद साधणे होय. ही प्रेमळ वाणी अहंकार विरहित आणि संयमी असावी. सर्वकाही कळत असूनही मनात अहंकार किंवा गर्व नसावा. अहंकार, दंभ, मीपणा मनात किंवा वर्तनात नसावा. ज्ञानी माणसामध्ये एक प्रकारची सात्विक नम्रता असते. आपल्या कानांनी सत्य ऐकावे. कुणाचे द्वेष, दोष मुळीच ऐकू नये. उदा:- महापराक्रमी कर्ण दुर्योधनाचा मित्र असूनही, प्रत्यक्षात कोणाच्याही दोषाचा किंवा अन्यायाचा वाटेकरी नव्हता. तरीही त्याला कर्माचे फळ भोगावे लागले. कर्णाने दुर्योधनाला साथ दिली पण तो दुर्योधनाच्या कुकर्माचा साथीदार नव्हता.
असंग्रही परित्यागी जीवन, सदासर्वदा विवेक चिंतन |
तुकड्यादास म्हणे त़या कळले, ते लोभी होतील प्रभुचे ||3||
असंग्रही म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तूचा साठा न करणे किंवा अनावश्यक गोष्टीचा संग्रह न करणे होय. परित्यागी जीवन म्हणजे लौकिक फळांची इच्छा न ठेवता, कर्मफळाचा त्याग करून निष्काम भावनेने जगणे होय. परित्यागी जीवन म्हणजे संन्यास घेऊन वनात जाणे नसून संसारात राहूनही निर्लेप राहणे. सदासर्वदा विवेक चिंतन करणे म्हणजे प्रत्येक कृती, विचार आणि निर्णयात काय योग्य (सत्य) आणि काय अयोग्य (असत्य) आहे याचा सतत विचार करणे होय. हे म्हणजे चांगल्या, वाईटातील फरक समजून सुजाणपणे जगण्याची जीवनशैली आहे. हे स्वतःच्या विचारांचे आत्मपरीक्षण आहे. म्हणूनच महाराज सदासर्वदा आत्मचिंतन करायला सांगतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यांना ईश्वराचे खरे स्वरुप आणि मानवतेच्या सेवेचे महत्व समजले आहे ते सांसारिक लोभ सोडून केवळ ईश्वर भक्ती आणि जनसेवेच्या गोडीत मग्न होतात. स्वार्थरहित प्रेम आणि समर्पण म्हणजे प्रभुचा लोभ होय. ज्यांनी आत्मज्ञान किंवा सत्याचा अनुभव घेतला आहे, ज्यांना समजले आहे की, खरे सुख देवाच्या भक्तीत आणि दुःखीतांच्या सेवेत आहे. जसे लोभी माणसाला पैशाची आसक्ती असते तशीच या ज्ञान्यांना प्रभुचे नामस्मरण, भक्ती आणि समाजसेवेची ओढ लागते ते सांसारिक मोहमाया सोडून भगवंताच्या प्रेमात आकंठ बुडतात.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180


0 टिप्पण्या